जळगाव प्रतिनिधी । रानभाज्यांचा आस्वाद घ्यायचाय ! चला, तर मग येत्या रविवारी जळगाव शहरात कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवास भेट देऊ या, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 9 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 11 वाजता रोटरी क्लब, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास रावेर मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती श्रीमती उज्वलाताई माळके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आरोग्याच्यादृष्टीने रानभाज्यांचे आहारातील महत्व
मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस अन्नाला अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश आवश्यक आहे. निसर्गामध्ये उपलब्ध रानभाज्या/फळे यांचे आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्व आहे. सद्य:परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे/रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास या भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल.
त्याचबरोबर रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरिराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशकांची फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे या भाज्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याने याची शहरी भागातील नागरीकांमध्ये जागृती व्हावी, त्यांना गोडी लागावी या उद्देशाने शासनाच्या कृषि विभागामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 9 ऑगस्ट, 2020 रोजी “रानभाजी महोत्सव” साजरा करण्यात येत आहे.
या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील 75 पेक्षा अधिक शेतकरी विविध रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत. यामध्ये करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, घोळ, अंबाडी, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा आदिंसह इतर विविध 20 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश आहे.
तरी जळगाव शहरातील नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवाचा लाभ घेऊन अवश्य भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांनी संयुक्तपणे केले आहे.