मुंबई (वृत्तसंस्था) मरकजला गेलेल्यांना गोळ्या घाला, राज ठाकरे यांचे हे वक्तव्य बेकायदेशीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला चिर देणारे आहे. अशा पद्धतीने गोळ्या मारण्याची भाषा इंग्रजांच्या काळामध्ये होती, पण आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा मी विरोध करतो. यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे.
आठवले पुढे म्हणाले की, मरकजमधील कार्यक्रमामुळे कोरोना वाढलेला आहे. जवळजवळ तीस टक्के केसेस या मरकजला गेलेल्या तब्लिगींमुळे वाढल्या आहेत. त्यांना शिक्षा झालेली आहे. त्यांनी काही मुद्दाम हा रोग पसरवला, असे म्हणता येणार नाही. मात्र ते एकत्र जमले, ही चूक आहे. त्यांनी अशा पद्धतीने लॉकडाऊन असताना कार्यक्रम पुढे ढकलायला हवा होता. परंतू म्हणून गोळ्या घालण्याची भाषा योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गोळ्या मारण्याची भाषा योग्य नाही. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा विरोध करतो. त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत, त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.