मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून त्यावर मध्यभागी राजमुद्रा आहे.
राजकीय अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महाअधिवेशन आज मुंबईत होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीमुळं बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे आपल्या पक्षाची नवी भूमिका मांडणार आहेत. ती भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. तत्पूर्वी महाअधिवेशनाच्या सुरुवातीलाच मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण करुन राज ठाकरेंनी पक्ष कात टाकत असल्याचे संकेत दिले आहेत. गोरेगावातील नेस्को ग्राऊण्डवर राज ठाकरे हे मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे यांच्यासह सकाळी नऊ वाजताच दाखल झाले होते.