कोल्हापूर | राज्य सरकार इंधनाचे दर कमी करणार नसून आपले हे चॅलेंज असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. येथील पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला होता. यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही. केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असं सांगतानाच इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही कपटी नाही. पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता राज्याने कमी केले पाहिजे.१४ राज्यांनी देखील दर कमी केले आहेत.
२०२४ ला काय करायचे ते जनता ठरवेल. शंभूराज देसाई यांनी त्यांचे बघावे, असंही त्यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे. भाजपने पोटनिवडणुकीत एकूण जास्त जागा जिंकल्या. राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात. संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत, असा चिमटा त्यांनी काढला. कलाबेन डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का? असा सवालही त्यांनी केला.