यावल, प्रतिनिधी | जिल्ह्यातील विविध कारणांनी रिक्त असलेल्या रास्त भाव दुकानांसाठी प्रथमच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यांची मुदत २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे. यात यावल तालुक्यातील ९ रास्त दुकानांचा समावेश आहे.
शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागासाठी रास्त भाव दुकान यांचे जाहीरनामा काढण्यासाठी प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० नोव्हेंबर २०२१ अशी आहे. रास्त भाव दुकानासाठी सदर प्रक्रिया राबविताना नोंदणीकृत संस्था, बचत गट, स्थानिक ग्रामपंचायती, सह. संस्था इत्यादी यात सहभाग नोंदवत असतात. सद्यस्थितीत रास्त भाव दुकानासाठी अर्ज स्वीकृती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येते. रास्त भाव दुकानासाठी अर्जाची ऑनलाइन पद्धतीने स्वीकृती करावी अशी कल्पना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुचवली आहे. याप्रमाणे प्रथमच राज्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा पुरवठा शाखेने यासाठी स्वतंत्र वेबसाइट विकसित केली आहे. यावल तालुक्यातील अट्रावल, म्हैसवाडी, वाघळूद, व या गावातील रास्तभाव दुकान परवानाधारकांने राजीनामा दिल्याने रिक्त आहेत. बोराळे या गावात रास्त भाव दुकानच नाही, पिळोद खुर्द येथील रास्त भाव दुकान रद्द करण्यात आल्याने रिक्त आहे. तर अट्रावल, सांगवी खुर्द, राजोरे येथील रास्त भाव दुकानदार गणेश वाणी हे मयत झाल्याने व त्यांच्या वारसांनी हक्क न दर्शविल्यामुळे रिक्त असलेले रास्त भाव दुकानांचा जाहीरनामा काढण्यात आला आहे.