मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कोरोना संकट वाढत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असं सांगत सूचक इशारा दिला आहे.
दुसरीकडे मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य प्रशासानची चिंता वाढली आहे. मुंबईत सोमवारी ४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली व ३ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्के झाले आहे. आता पुन्हा एकदा लॉकडाउनचं संकट घोंघावू लागलं आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या चेंबूरमधील एम-पश्चिम वॉर्डकडून सोसायटी आणि फेरीवाल्यांना चाचणी करण्याच सांगण्यात आलं आहे. येथील सर्वाधिक रुग्ण उंच इमारतींमधील आहेत. पालिका अधिकाऱ्यांनी लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
एका आठवड्यापूर्वी या वॉर्डमध्ये दिवसाला १५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र आता हे प्रमाण २५ वर गेलं आहे. दिवसाला रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्क्यांवर पोहोचला असून पालिका अधिकारी यासाठी नागरिकांकडून सर्रासपणे होणारं नियमांचं उल्लंघन यासाठी जबाबदार असल्याचं सांगत आहेत. परिस्थितीची दखल घेऊन पालिकेने निवासी सदनिकांना नोटीस पाठवली असून नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली आहे.