मुंबई : वृत्तसंस्था । अनिल देशमुखांवरील सीबीआयचे धाडसत्र म्हणजे राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या बदनामीचा पूर्वनियोजित कट असून दूध का दूध और पानी का पानी होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. अजूनही अँटिलिया गुन्ह्याचा छडा का लागला नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळपासून सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर सीबीआयनं हा तपास हाती घेतला असून त्याअनुषंगाने हे छापे टाकण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे.
यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. “ज्या दिवशी परमबीर सिंह यांचं पत्र प्रसिद्ध झालं, तेव्हाच मी म्हणालो होतो की हा नियोजित कट आहे. देवेंद्र फडणवीस, परमबीरसिंग दिल्लीत गेले. पहाटे अमित शहांची भेट घेतली आणि एनआयएकडे हा तपास गेला. पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणं म्हणजे भाजपानं विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेलं कट-कारस्थान आहे. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही”, असं ते म्हणाले.
हे सगळं कारस्थान परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. “मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी एनआयएकडे तपास देऊन किती दिवस झाले. महिना होऊन गेला. तरी त्याचा तपास लागत नाही. वाझेंचं नाव मुख्य आरोपी म्हणून आलं. त्यांची पोलीस कोठडी संपून न्यायालयीन कोठडी सुरू झाली. तरी तपास लागत नाही. वाझे आणि परमबीर सिंगांवर बोट गेल्यानंतर यातून सुटण्यासाठी आणि त्यांना माफीचा साक्षीदार करण्यासाठी भाजपाकडून हे कटकारस्थान सुरू आहे. त्यामुळे लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल आणि अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील”, असं मुश्रीफ म्हणाले.