मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली अशी आहेत ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सौहार्द वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील.
दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास असे करण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.
राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” शब्दाऐवजी मराठी भाषेत “अनुसूचित जाती व नव बौध्द” या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
सेवार्थ प्रणालीत नोंदणी न झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ
मुंबई विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये प्रवेशित न झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित असल्याचे समजून त्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
शासनाने सर्व अकृषि विद्यापीठांसाठी मंजूर केलेल्या पदांची बिंदुनामावली स्वतंत्र ठेवण्यात यावी. अशा अनुदानित पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या विद्यापीठाने विनाअनुदानित पदावर करू नयेत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात उद्भवणार नाहीत असाही निर्णय सरकारने घेतला आहे .