मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला १०० रूपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात विविध निर्णय घेण्यात आले. यातील लक्षणीय निर्णय म्हणजे पुन्हा आनंदाचा शिधा वाटपाचा होय. राज्यातील शिदा पत्रिका धारक १ कोटी ६३ लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे कार्ड असलेल्या नागरिकांना केवळ १०० रुपयात महत्त्वाच्या चार गरजेच्या वस्तू मिळणार आहेत. याच्या अंतर्गत १ किलो रवा, १ किलो चना डाळ, १ किलो साखर तसेच १ लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा १०० रूपयात मिळणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील १ महिनाभर ही योजना सुरु राहील. यातल्या आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे प्रक्रिया सुरु केली जाईल. तसेच २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे.