मुंबई : वृत्तसंस्था । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळा, लॉकडाउन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या लागू असणारे निर्बंध राज्य सरकारकडून अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउनला उद्योजक तसंच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत विरोध असल्याने निर्बंध अजून कठोर केले जाण्याची शक्यता असून राज्य सरकारकडून आज यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
“बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यांमध्ये कुठेही नाही. काही ठराविक रुग्णालयात जिथे खूप मागणी असते तिथे अडचणी निर्माण होत आहे. सध्या मुंबईत आयसीयूचे ४०० बेड्स, ऑक्सिजनचे २१६० बेड्स आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड्स उपलब्ध आहेत. बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
लसीकरण वेगाने सुरु असून हर्ड इम्युनिटी आणण्याचा प्रयत्न असून त्यातून रुग्णसंख्या कमी होताना दिसेल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “लॉकडाउनच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरु असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधीचं पावलं राज्य शासन उचलणारच आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी टाळावी हाच दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत. अंतिम झाल्यानंतर त्यानंतर कळवण्यात येईल”.
“ज्यांनी कटाक्षाने मास्क वापरला आहे, गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टनिसंग ठेवत आहेत अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत कोरोना होण्याचं कारण नाही. कारण कोरोना आपल्या तोंडातून निघणाऱ्या शिंतोड्यातून पसरला जातो.त्यामुळे मास्क घातल्यानंतर आपण संसर्ग पसरवत नाही आणि स्वत:सुद्धा सुरक्षित राहू शकतो. मास्क न घातल्याने मोठ्या पद्दतीने संसर्ग होण्याची भीती असते. आपल्यालाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,” असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं.
संख्या अशीच राहणार असेल आणि लोक बेफिक्रीने वागणार असतील तर निर्बंध अधिक कडक करणे यासंदर्भातील निर्णय घ्यावाच लागेल. नियम पाळा आणि लॉकडाउन टाळा एवढंच मला सांगायचं आहे,” असंही राजेश टोपेंनी सांगितलं आहे.