मुंबई, वृत्तसेवा । पालघर येथे १६ एप्रिल रोजी पोलिसांसमक्ष दोन साधूंची हत्या करण्यात आली. ही मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
पालघरच्या घटनेची मुख्यमंत्र्यांना सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः मुख्यंमंत्र्यांकडे विचारणा केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला आणि सोशल मीडियावरून या प्रकरणी सरकारची नाचक्की झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी बोलले. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता, तरीही त्यांनी चार दिवस वेळ लावला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.