नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारने राज्यांना २०२१-२२ साठी आपत्ती निधीचा पहिला हप्ता जारी केला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला ८८७३.६ कोटी रुपये दिले यापैकी ५० टक्के रक्कम कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोनामुळे देशाची स्थिती गंभीर होत असून राज्यांची हतबलता स्पष्ट दिसत आहे. काही राज्यांनी स्थिती हाताबाहेर जात असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत.
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी साधारणत: जून महिन्यात दिला जातो. मात्र यंदाची कोरोना स्थिती पाहता हा निधी मे महिन्यातच जारी करण्यात आला आहे. यापैकी ५० टक्के म्हणजेच ४४३६.८ कोटी रुपये कोरोना स्थिती हातळण्यासाठी वापरता येणार आहेत. यात रुग्णालय, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरणावर हा निधी वापरता येणार आहे. रुग्णवाहिका सेवा आणखी सक्षम करण्याबरोबर थर्मल स्कॅनर, चाचणी केंद्र आणि चाचणी किटचाही समावेश करण्यात आला आहे. गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर ही रक्कम एक महिना आधीच जारी करण्यात आली आहे.