मुंबई वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दळवी यांना रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही वेळातच राज्यमंत्री तनपूरे यांनी रिपोर्टबद्दलची माहिती ट्विट केली. कोरोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असं राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, “सतत फिल्डवर आहे. लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला, तरी शेवटी काल केलेल्या चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या,”.
शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघाले होते. धरमतर खाडी पुलापर्यंत आले असताना दळवी यांच्या चाचणीचा अहवाल मेसेजद्वारे आला. संसर्ग झाल्याचे समजताच ते तात्काळ माघारी फिरले. कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून पुढील १० दिवस ते घरीच क्वारंटाईन राहणार आहेत. संपर्कातील व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली.