जयपूर वृत्तसंस्था । मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंगोत्सवाला उधाण आलेले असतांनाच राजस्थानात काँग्रेसने याचा प्रचारासाठी अतिशय अफलातून वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे.
राजस्थानमध्ये अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. यामुळे येथे काँग्रेसची सत्ता आलेली आहे. यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना राफेल पतंग उपलब्ध करून दिली आहे. यावर राफेल खरेदी प्रकरणी राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारलेले चार प्रश्न छापण्यात आलेले आहेत.
या चार प्रश्नांमध्ये-
१) देशाला धोका असतांना १२६ ऐवजी फक्त ३६ राफेल विमानांची खरेदी का ?
२) कॅग रिपोर्टला नकार असेल तर जेपीसी का नाही ?
३) फक्त १० दिवसांआधीच अस्तित्वात आलेल्या अंबानीच्या कंपनीला एचएएलला डावलून कंत्राट कशासाठी मिळाले ?
४) मनोहर पर्रीकर यांच्याकडे कोणत्या फाईल्स आहेत ?
आदींचा समावेश आहे. राजस्थानमध्ये मकर संक्रांतींच्या कालखंडात या प्रकारे प्रश्नावली छापलेल्या तब्बल २० हजार पतंगांना वितरीत केले जाणार आहे. या माध्यमातून राज्यात भाजपविरोधी वातावरण निर्मिती केली जाणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.