मुंबई, वृत्तसंस्था | संजय राऊत यांनी वीर सावरकर यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे, त्याचे मी स्वागत करतो. कारण हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेला सल्लाच आहे. असे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचे धाडस दाखवले आहे. त्याचे मी कौतुक करतो, असेही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.
शिवसेनेची भूमिका सावरकरांना पाठिंबा देणारी आहेच. आता येत्या काळात शिवसेना काँग्रेसचीही समजूत घालेल आणि त्यांना सांगेल की, तुमचा सावरकर विरोध हा फुकाचा आहे, तो बाजूला ठेवा, असा विश्वासही रणजीत सावरकर यांनी व्यक्त केला. दरम्यान संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच किती दिवस आपण इतिहासावरच बोलायचे ? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच इंदिरा गांधी या डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत येत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला. काँग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांच्याविरोधातली नाराजीही उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. ज्यानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतले होते. आता वीर सावरकर यांच्याबाबत त्यांनी भूमिका मांडली आहे. आता याबाबत काँग्रेस काय बोलणार हे पाहणे, महत्त्वाचे ठरणार आहे.