पाचोरा, प्रतिनिधी । रस्त्यावर वाहने चालवतांना चुकीला माफी नाही. “नजर हटी दुर्घटना घटी” याप्रमाणे सदैव वाहने सावकाश चालवावी व सुरक्षित अंतर ठेवुनच रस्ते नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आपला व समोरच्या व्यक्तींचा जीव वाचवावा. वाहन चालवतांना मोबाईलचा वापर टाळावा असे आवाहन पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी केले. ते पाचोरा आगारात केवलाई फाऊंडेशनतर्फे आयोजित रस्ते सुरक्षा जनजागृती अभियानात बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आगार प्रमुख देवेंद्र वाणी, आगार वरिष्ठ सचिव रवि पाटील, आगार ए. टी. एस. मनोज तिवारी, योगेश जाधव, कॉंग्रेस जिल्हा सचिव इरफान मणियार, पाचोरा पोलिस स्टेशनचे ट्राफीक काॅनस्टेबल नंदकुमार जगताप, बापु महाजन, प्रकाश पाटील, विजय पाटील, उपस्थित होते.
भारत सरकार रस्ते व महामार्ग मंत्रालय अंतर्गत “सडक सुरक्षा, जीवन रक्षा” रस्ते सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन येथील केवलाई फाऊंडेशनतर्फे करण्यात आले होते. या अभियानाचे अध्यक्षस्थानी पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे हे होते. यावेळी केवलाई फाऊंडेशनचे अध्यक्ष आबा पाटील यांनी प्रास्ताविक केले. तसेच आगार वरिष्ठ सचिव रवि पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जितेंद्र महाजन या बाल कलाकाराने रस्ते सुरक्षा जनजागृती बाबत गीत सादर केले. तसेच पवन पाटील, देवेंद्र पाटील, कल्पेश पाटील, सौरभ महाजन, राकेश पाटील, सोमनाथ कोळी, प्रतिक पाटील या युवकांनी रस्ते सुरक्षावर आधारीत पथनाट्य सादर केले. व डॉ. जागृती देसले या युवतीने सुरक्षिततेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या बाल कलाकारांनी रस्ता सुरक्षिततेबाबत शहरातील मुख्य चौकात पथनाट्य, गीत गायन व मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन व आभार सुधाकर सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केवलाई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुपडु पाटील, कार्याध्यक्ष अशोक पाटील, संचालक विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.