यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राज्य मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी. यासाठी आज जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. काम सुरु होताच त्याची खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले.
गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा तालुक्यातील अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राज्य मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असल्याने या मार्गावरील रस्त्यावर अनेक वेळा अपघात होवून निरपराध नागरीकांना आपला जीव गमावाव लागला आहे. याविषयी वारंवार तालुकावासियांनी तक्रार करूनही प्रशासनाकडून यावलकडील रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने आज मंगळवार, दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी येथील उपोषण सुरु केले होते.
रविन्द्र पाटील यांचे उपोषण सुरू होताच अधिकाऱ्यांनी या मार्गावरील कामास सुरुवात केली. दुपारी खासदार रक्षा खडसे यांनी उपोषणस्थळी भेट देत दिली. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर वेळीच दखल घेतली असती तर पदाधिकाऱ्यांवर उपोषणाची वेळ येणार नसल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.
खासदारांनी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेशही यावेळी दिले. खासदार खडसे यांनी उपोषणार्थी पाटील यांना लिंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जे.एस.तडवी, अभियंता निंबाळकर, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे सागर कोळी यांचेसह अनेक भाजपाचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.