जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्रातर्फे योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार उत्तम योग शिक्षक बनण्याची सुवर्णसंधी या अभ्यासक्रमांमुळे प्राप्त झाली आहे. सहा महिन्याच्या सर्टीफिकेट प्रोग्राम इन योग या अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in संकेतस्थळावर या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
तसेच योगाभ्यासाचे शास्त्रोक्त ज्ञान, मानवी शरीराचा सामान्य परिचय, प्रात्यक्षिक, योगिक जीवनशैलीचे परिपूर्ण ज्ञान आहार ही अभ्यासक्रमाची वैशिष्टये आहेत. हा अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना योगशिक्षक म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध आहेत.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कृणाल महाजन, डॉ. लिना चौधरी यांच्याशी ०२५७-२२५७१८० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभाग प्रमुख इंजि. राजेश पाटील यांनी केले आहे.