योगींनी थोपटली स्वत:चीच पाठ

 

 

 

प्रयागराज : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यामध्ये राज्य सरकारला यश आल्याचं सांगताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची तुलना थेट अमेरिका आणि युरोपशी केलीय.

 

राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळताना राज्य सरकार २०२० पासूनच चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचं योगींनी लखनऊमधील एका कार्यक्रमात म्हटलं. राज्यातील दर १० लाख लोकसंख्येमागे कोरोना मृतांचा आकडा ४७ इतका असल्याचं योगींनी सांगितलं. राज्य सरकारची कामगिरी किती चांगली आहे हे सांगताना या मृत्यूदराची तुलना योगींनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रासोबत केली. अमेरिका आणि युरोपमधील प्रगत राष्ट्रांमध्ये अधिक चांगल्या आरोग्य सुविधा असूनही तेथे दर १० लाखांमागे १८०० ते २१०० जणांचा मृत्यू झाल्याचं योगींनी म्हटलं आहे.

 

उत्तर प्रदेशमधील राज्य सरकारच्या कायदा विषयक विभागाने प्रकाशित केलेल्या  पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने योगी आदित्यनाथ बोलत  होते. बेजबाबदार पद्धतीने कारभार केल्यामुळे इतर राज्यांमध्ये आणि देशांमध्ये   मृतांचा आकडा जास्त असल्याचं योगींनी म्हटलं. या उलट उत्तर प्रदेशमध्ये   नियोजन, चाचण्या आणि उपचारांवर जोर देण्यात आल्याचंही योगींनी सांगितलं.

 

“भारताशी तुलना केल्यास अमेरिका आणि युरोपमध्ये खूप चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत. मात्र या देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि तेथील मृत्यूचा दर हा खूप जास्त आहे. अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी आहे आणि तिथे सहा लाखांहून अधिक जणांचा  मृत्यू झालाय.  भारतामध्ये १३५ कोटी लोकसंख्या असताना तीन लाख २५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एखाद्याचा मृत्यू होणं सुद्धा वाईट गोष्ट आहे. जीव वाचवण्याचा प्रत्येक स्तरावर प्रयत्न झाला पाहिजे. असं असलं तरी कमकुवत आरोग्य व्यवस्था असतानाही भारताने इतर देशांपेक्षा चांगली कामगिरी केलीय,” असं योगी म्हणाले.

 

दोन्ही लाटांच्या वेळेस उत्तर प्रदेशासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र दोन्ही वेळेस आम्ही ही चिंता चुकीची असल्याचं कामगिरीतून सिद्ध केल्याचं योगी म्हणाले. पहिल्या लाटेच्या वेळेस लॉकडाउन लागेल आणि तो दोन महिने सुरु राहील असं वाटलं नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. लॉकडाउनला लागण्यापूर्वीच सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं योगींनी सांगितलं. “२२ मार्च २०२० रोजी लॉकडाउनची घोषणा झाली तेव्हा मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा फोन आला. त्यांनी आपल्याला उत्तर प्रदेशची चिंता वाटत असल्याचं सांगितलं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मला शक्य आहे ते सर्व मी करेन असा शब्द मी त्यांना दिला. पहिल्या लाटेच्या वेळेस  प्रादुर्भाव रोखण्यात उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात यशस्वी राज्य ठरलं होतं,” असं योगी म्हणाले.

 

दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा वेगळी असल्याचं योगींनी सांगितलं. पहिल्या काही दिवसांमध्ये उपचार सुरु केले नाही तर रुग्णांची प्रकृती चिंताजनक होण्याची आणि नंतरही आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता या लाटेत अधिक होती. सरकारने १४ तज्ज्ञांचा समावेश असणारी सल्लागार समिती नेमली होती. या समितीच्या सल्ल्यानुसार सरकार काम करत असल्याचं योगींनी म्हटलं आहे. ग्रामीण भागात काळजी घेण्यात आल्याचं योगींनी म्हटलं.

 

लोकांमध्ये जागृती करण्याची गरज योगींनी बोलून दाखवली.   ग्रामीण भागात  अनेक ठिकाणी लोकांनी कोरोनाला देवी समजलं आणि ते त्याची पुजा करु लागल्याचंही योगी म्हणाले. “या त्यांच्या भावना झाल्या. मात्र त्याचवेळी यामुळे त्यांच्याकडे योग्य माहिती पोहचली नसल्याचं स्पष्ट झालं. आजारात काळजी घेणं हे इलाजापेक्षा उत्तम आहे. मात्र तरीही काही जण आजारी पडले तर त्यांना वेळेत उपचार मिळायला हवेत,” असं योगी म्हणाले.

 

 

Protected Content