येस बँकेला २०१४ नंतर कर्ज वाटप करण्याची परवानगी कोणी दिली?; चिदंबरम यांचा सवाल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) येस बँकेचे लोन बुक २०१४ ते २०१९ च्यादरम्यान पाच पटीने वाढले. २०१४ मार्चमध्ये लोन बुक रक्कम ५५ हजार कोटी रुपये होती, त्यामध्ये मार्च २०१९ मध्ये वाढ होऊन २ लाख कोटीहून अधिक झाली. फक्त दोन वर्षांत ९८ हजार कोटींची वाढ होऊन २ लाख कोटींपेक्षा जास्त झाली. त्यामुळे येस बँकेला २०१४ नंतर कर्ज वाटप करण्याची परवानगी कोणी दिली?, असा सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजपावर विचारला आहे.

 

यावेळी अर्थमंत्री पी. चिदंबरम पुढे म्हणाले की, आजारी येस बँकेला मदत करण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयावर वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शंका उपस्थित केली आहे. येस बँकेची या संकटातून सुटका करण्यासाठी एसबीआयला हुकूम देण्यात आल्याचे माझे मत आहे. ज्याप्रमाणे एलआयसी स्वेच्छेने आयडीबीआय बँकेची सुटका करण्यासाठी तयार नव्हती, तसेच एसबीआय सुद्धा येस बँकेच्या सुटकेसाठी स्वेच्छेने तयार आहे असे मला वाटत नाही. एसबीआयला तसे निर्देश देण्यात आले आहेत, असे चिदंबरम म्हणाले. आर्थिक संस्थांमध्ये भाजपा सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. तर येस बँकेला वाचवण्यासाठी स्टेट बँकेच्या सध्याच्या योजनेवरूनही पी. चिदंबरम यांनी सवाल उपस्थित केला आहे.

Protected Content