यावल, प्रतिनिधी | येथील पालिकेत काँग्रेसचे नगरसेवक शेख असलम शेख नबी यांच्याविरुद्ध माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांनी दाखल केलेला अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंजूर करीत नगरसेवक शेख असलम शेख नबी यांना अपात्र घोषीत केले आहे. त्यामुळे यावलच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नगरसेवक पदावर असतांना आपल्या पत्नी शाहिस्ता परवीन शेख यांच्या नावावर असलेल्या जागेवर अल्प स्वरूपाची बांधकाम परवानगी घेवून त्यापेक्षा जास्तीचे मोठे बांधकाम केल्याचा आरोप नगरसेवक शेख असलम शेख नबी यांच्यावर करण्यात आलेला होता. तर त्यांना अपात्र करण्यात यावे असा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शशांक देशपांडे गेल्या २६ नोव्हेंबर २०१८ला सादर केला होता. नगरसेवक शेख असलम शेख नबी यांच्या पत्नी शाहीस्ता परवीन यांनी शहरात गट क्रमांक७५३मधील प्लॉट क्रमांक ५८वर१५६.९ चौ.मि. पैकी केवळ ०.६९ चौ.मि. क्षेत्रफळाची बांधकाम परवानगी घेऊन प्रत्यक्षात अंदाजे १४५ चौ.मि. बांधकाम केल्याचा व ९९.१६२ चौ.मि. जास्तीचे बांधकाम केले आहे. यासाठी पालिकेने संबंधितास ३४.५४ चौ.मि. अनाधिकृत बांधकाम स्वखर्चाने काढून घेणे संदर्भात नोटीसही दिली आहे. पालिकेच्या या नोटीस विरोधात त्यांनी यावल न्यायालयात खटला दाखल केला आहे.तसेच सदरहू बांधकामाचे आजपावेतो कंप्लीशन सर्टीफिकेट घेतले नसल्याचा आरोप आहे. नगरसेवक शेख असलम नबी हे प्रभाग क्रमांक ५ ब मधून निवडून आले आहेत. ते पदाचा दुरुपयोग करुन पालिका कर्मचाऱ्यांवर दबाव टाकू शकतात. असे तक्रार अर्जात नमूद असून नगरसेवक शेख असलम नबी यांचेवर नगरपालिका कायदा कलम४४ ( १ ) ई नुसार अपात्रतेची कारवाई करावी. अशी मागणी माजी नगराध्यक्ष देशपांडे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नगरसेवक शेख असलम शेख नबी यांना महाराष्ट्र नगरपालिका कायदा कलम ४४ ( १ ) ई नुसार अपात्र घोषीत केले आहे.