जळगाव प्रतिनिधी । यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्यासाठी केसरीराजचे संपादक आणि ग्रामीण पत्रकार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.
गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की अत्यंत अकार्यक्षम असलेले जळगाव जिल्ह्यातील तालुका यावलचे पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मनमानी व निव्वळ प्रसिध्दीलोलूप कारभाराला त्या तालुक्यातील लोक वैतागलेले आहेत. स्थानिक राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनलेले पो.नि. धनवडे त्यांना मिळालेल्या अधिकारांचा दुरूपयोग सामान्य लोकांना सतत त्रास देण्यासाठी करतात अशी त्यांची प्रतिमा बनलेली आहे. पो.नि. धनवडे या पोलिस अधिकार्याने केवळ पैशांच्या हव्यासापोटी सगळे नियम व कायदे खुंटीला टांगून कित्येक निरपराध लोकांना त्रास दिलेला असल्याने त्यांच्याविरोधात तालुक्यात मोठा जनक्षोभ खदखदतो आहे. त्यातही भर म्हणजे पो.नि. धनवडे यांच्या भलत्याच कुरापती स्वभावामुळे भलतीच ब्याद मागे लागलेली नकोे म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकारीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मला वरिष्ठांकडून आशीर्वाद असल्याचा अपप्रचार त्यांनी तशा प्रचारासाठी खास नेमलेले पंटर करीत आहे. त्यामुळे पो.नि. धनवडे यांना जाब विचारण्याची कुणाचीच हिंमत नसल्याच्या त्यांच्या हितसंबंधियांच्या प्रचाराचा त्रास दिवसेंदिवस वाढतो आहे.त्यांचे काही खास पंटर तर त्यांच्या नावाचा वापर करून सामान्य व्यापारी,व्यावसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या अप्रत्यक्ष धमक्या देत कमाई करीत असल्याच्याही तक्रारीही लोक करीत आहेत.
या निवेदनात त्यांनी डांभुर्णीचे पत्रकार मनोज नेवे यांच्यावर पोलिसांनी आकसाने केलेली अटकेची कारवाई आणि त्यांनतर च्या काळात न झालेल्या बढतीसह बदलीच्या मुद्द्यावर लोकांची दिशाभूल करून घडवून आणलेल्या जाहीर सत्काराच्या चमकोगिरीचाही तपशील पुराव्यांसह मांडलेला आहे. सारे जग कोरोना संकटात हादरलेले असताना पो.नि. धनवडे व त्यांच्या चेलेचपाट्यांनी तालुक्यात घातलेला हैदोस थांबवणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात गर्दी जमवून त्यांनी घडवू आणलेल्या त्यांच्या कथित सत्कारांचे उत्तरदायित्व पोलिस खाते घेणार आहे की नाही?, हा सामान्यांचा खरा प्रश्न आजही निरूत्तरित आहे असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे
पत्रकार मनोज नेवे यांच्या नंतर पुन्हा दुसर्यांदा आणखी कुणाचे आयुष्य पो.नि. धनवडे यांच्या मनमानी व गलथान कारभारामुळे उद्ध्वस्त होऊ नये अशी दहशत बसावी इतकी भिती लोकांना वाटते आहे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.