अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेरातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पतीला मारहाण करतांना आवरण्यासाठी गेलेल्या पत्नीला मारहाण करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १८ मे रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला सुरूवात करण्यात आली आहे. या यात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते. बुधवारी १७ मे रोजी रात्री १० वाजता शहरातील २४ वर्षीय महिला ही आपल्या पतीसह यात्रोत्सवात आलेल्या होत्या. त्यांनी पालखीत बसण्यासाठी तिकीट काढून रांगेत पतीसह उभ्यात होत्या. दरम्यान, महिलेचे पतीचा एका तरूणाला धक्का लागल्याने वाद निर्माण झाला. यात चार जणांनी महिलेच्या पतीला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीला मारहाण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेन धाव घेवून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाने महिलेला अश्लिल शिवीगाळ करून अंगावर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. या झटापटीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून खाली पडल्याने नुकसान झाले. महिलेचा नातलग याने मारहाण करणाऱ्यांना ओळखले होते. यात हर्षल उर्फ पाट्या नाना पाटील रा. पैलाड, अमळनेर, प्रविण उर्फ चिया प्रकाश पाटील आणि इतर दोन अनोळखी तरूण असे चार जणांविरोधात महिलेने तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी १८ मे रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.