मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना टास्क फोर्समधील डॉ. तात्याराव लहाने यांनी या आजाराबाबत महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता असं डॉ. लहाने यांनी सांगितलं
कोरोना संकटाबरोबरच राज्यात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलंय. राज्यात विविध भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारामुळे राज्यात 90 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
म्युकर जमिनीतून आपल्या शरिरात जातो. पण तो हवेतून पसरतो असं म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसल्याचं डॉ. लहाने यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, राज्यात साथीच्या आजारात याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या सध्या 800 केसेस आहेत. 110 ठिकाणी म्युकरच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात या आजारावरील औषधे सध्या कमी आहे. आधी याची गरज नसल्याने कंपन्यांनी त्याचं उत्पादन केलं नव्हतं. मात्र, आता राज्य सरकारनं म्युकरमायकोसिसवरील औषधांवर नियंत्रण ठेवलं आहे. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचं वितरण होत असल्याची माहितीही डॉ. लहाने यांनी दिलीय.
कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून सध्या उद्योगांचा ऑक्सिजन रुग्णालयांकडे वळवला आहे. मात्र, या इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्याबाबत माहिती देताना इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होतो असं नसल्याचं डॉ. लहान यांनी स्पष्ट केलंय. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. मातीशी संपर्क येऊ देऊ नका. म्युकरची लक्षणं दिसून आल्यास तातडीने डॉक्टरकडे जा, असं आवाहनही डॉ. लहान यांनी केलं आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येणार आहे. या आजारात लागणाऱ्या सर्व औषधांचा खर्चही या योजनेतून दिला जाणार आहे . महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत केली जात होती. मात्र, म्युकरमायकोसिसमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. त्यामुळे या योजनेत काहीसा बदल करुन म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार आहे. राज्यात सध्या असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या पाहता 2 लाख एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन्सची गरज आहे राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे.