जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाजारांमध्ये टोळीने जात अल्पवयीन मुलांच्या मदतीने बाजारात आलेल्या ग्राहकांच्या खिशातून मोबाईल लांबविणार्या झारखंडच्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. संशयित आरोपींकडून चोरीचे १५ मोबाईल हस्तगत केले आहे.
तुफान रघू रिखीयासन (वय-३०, रा. पुरानाभट्टागाव) व बारिश अर्जुन महतो (वय-३५, रा. महाराजपुर नया टोला कल्याणी जि. साहेबगंज झारखंड) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना अकोला येथून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दादावाडीतील वृद्ध मोबाईल दुरुस्त करण्यासाठी सोमाणी मार्केटमध्ये जात होते. रस्त्याने जात असतांना आठवडे बाजारपट्ट्यात समोरुन येणार्या चार अनोळखी इसमांनी वृद्धाचा रस्ता अडविला. तसेच त्यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातून मोबाईल हिसकाविल्याची घटना घडली होती. दरम्यान, वृद्धांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोबाईल हिसकाविणार्या तिघांना पकडून ठेवले होते तर त्यांचा एक साथीदार पसार झाला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी पळून गेलेला साथीदार अकोला येथे असल्याच माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत त्याठिकाणाहून तुफान रघू सिखीयासन याला ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर त्याने टोळीतील दुसरा साथीदार बारिश अर्जुन महतो या संशयिताच्या शेगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथून १३ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.