नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लॉकडाऊनमध्ये शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. प्रीपेड मोबाइल रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्याची आणि विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानं सुरू ठेवण्यास सरकारने मुभा दिली आहे. माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
देशात बहुतेक ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत आहे आणि ते समाधानकारक आहे. जे क्षेत्र हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमध्ये नाहीत तेथील उद्योग सुरळीत करण्याचे प्रयत्न राज्य सरकारांकडून सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीला वेग आला आहे. अनेक ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग, विशेष आर्थिक क्षेत्र आणि निर्यात केंद्रांच्या कामांना गती आली आहे. रस्ते बांधीणी, सिमेंट उत्पादन आणि विट भट्ट्या सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळाला आहे. औद्योगिक कंपन्यांच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती देखील गृहमंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.