नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धरणगाव येथे क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांच्या स्मृती स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ कोटींच्या निधीला मान्यता दिली असून या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
धरणगाव तालुक्यातील हेडगेवार नगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्या स्मृतिस्थळाच्या विकास कामासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक आज विधान भवन, नागपूर येथे पार पडली.
या बैठकीच्या वेळी ग्राम विकास मंत्री नामदार गिरीश महाजन, ग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीना, वित्त विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वैद्य, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज एशिया, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव गिरी, अवर सचिव राठोड, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण आदिवासी भिल्ल समाजाच्या आद्य प्रवर्तक व प्रेरणास्थान असलेले, स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी समाजाच्या अग्रेसर भूमिका मांडणारे क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, त्यांच्या जीवनपटावरील विविध बाबी उलगडणारे भव्य असे स्मृती स्मारक धरणगाव येथे उभारले जाणार असून या ठिकाणी सभागृह यात्री निवास वाचनालय वस्तू संग्रहालय आदी बाबींचा समावेश असणार आहे. यासंबंधी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत पाठपुरावा होता.
खरं तर, २०१८-१९ साली या प्रकल्पाची मुहूर्तमेढ झाली, परंतु दरम्यानच्या आघाडीच्या काळामध्ये सदर प्रकल्प मंजुरीसाठी प्रलंबित होता. आज शिखर समिती द्वारे सदर आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात आली. लवकरच या ठिकाणी स्मारकाचे काम सुरू होईल अशी माहिती नामदार गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.