वसई: वृत्तसंस्था । वसईत विविध रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे रात्रीच्या वेळेस ही जनावरे वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी पशुप्रेमींकडून मोकाट जनावरांच्या शिंगावर रेडियमचे पट्टे मारण्यात आले आहेत.
काही महिन्यांपासून मोकाट जनावरांनी आपला मोर्चा थेट विविध ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर वळविला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, चिंचोटी-भिवंडी राज्य मार्ग तसेच वसई-विरार शहराला जोडणाऱ्या विविध मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे मुक्तपणे संचार करतानाचे चित्र आहे. वसईच्या पूर्वेतील ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी,पेल्हार, भालीवली, सकवार यासह इतर भागांतील मुख्य मार्गावर ही जनावरे मोकाट फिरत असतात.
मोकाट जनावरे चाऱ्याच्या शोधात मुख्य रस्त्यावर येऊ लागली आहेत. महामार्गाच्या कडेला व महामार्गाच्या दुभाजकामध्ये गवत उगवले आहे ते खाण्यासाठी अनेक जनावरे रस्ता ओलांडून जात असतात. कधी कधी ही जनावरे महामार्गावरील असलेल्या दुभाजकांच्या मध्ये उगवलेले गवत खाण्यासाठी रस्त्याच्या मध्ये येत असतात. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना आपल्या वाहनांचा वेग पटकन नियंत्रणात आणता येत नाही. यामुळे अपघात होऊन वाहनांचे नुकसान होत असून वाहनचालकांनाही आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. काही वेळा अपघातात जनावरांचाही मृत्यू होतो.
यासाठी जनावरांच्या शिंगांना जर रेडियमचे पट्टे असतील तर लांबून ही जनावरे निदर्शनास येतील, यामुळे जनावरे व वाहनचालकांचे होणारे अपघात रोखण्यास मदत होणार आहे.