मुंबई वृत्तासंस्था । मेगाभरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला या विधानावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सावरासावर केली आहे. मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला, असे पाटील यांनी सांगितले असून त्यांनी या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम करतो. मेगा भरतीचा निर्णय हा कोणा एकटयाचा नाही तो, कोअर कमिटीचा निर्णय होता असे पाटील यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी तिकीट वाटपामध्ये जुन्या लोकांना डावललं नाही असा त्यांनी दावा केला. बाहेरुन आलेल्या फक्त २७ जणांना तिकिट दिली असे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले होते पाटील
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अन्य पक्षांतील बडय़ा नेत्यांना गळाला लावून संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न भाजपने केला असला तरी या ‘भरतीमुळेच भाजपच्या मूळ संस्कृतीला धक्का लागला, असे सांगत भरतीच्या प्रयोगामुळे पक्षाचे नुकसानच झाल्याची अप्रत्यक्ष कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली होती’. अशा प्रकारची कबुली देऊन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अन्य पक्षांतील नेत्यांच्या भरतीबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह लावले आहे.