मुंबई प्रतिनिधी । भंडारा येथील आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी असून कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही
टोपे यांनी सांगितले.
याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने ७ बालकांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे.
याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असून चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल, असेही आरोग्यमंत्रांनी स्पष्ट केले आहे.