मुसळधार पावसामुळे महावितरणचे मोठे नुकसान; दुरूस्तीच्या कामाला गती

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या तांडवाने महावितरणच्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर परिसराला वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या जळगाव, उमापूर, जामोद आणि जळगाव आयपीडीएस या उपकेंद्राचा वीज पुरवठा पर्यायी व्यवस्थेतून  पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. पावसाचा असर कमी होताच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू झाले असुन दुरूस्ती कार्याला गती देण्यासाठी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधिक्षक अभियंता सुरेंद्र कटके ऑनफील्ड आहे.

३२ केव्ही बाळापुरहुन १३२ केव्ही जळगाव जामोद उपकेंद्राला वीज वाहिनीचा १४७ क्रमांकाचा मनोरा जमिन दोस्त झाल्यामुळे १३२ केव्ही जळगाव,३३ केव्ही उमापूर,३३ केव्ही जामोद आणि ३३ केव्ही जळगाव आयपीडीएस या उपकेंद्राचा वीज पुरवठा बाधित झाला होता.याशिवाय आसलगाव परिसरात ७ रोहित्राचे स्ट्रक्चर सह ३३ केव्ही व ११ केव्हीचे अनेक पोल वाहून गेले आहे.त्यामुळे या परिसरातील ४८ गावे अंधारात गेली होती.

जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. नदी- नाले भरून वाहत असल्यामुळे अनेक गावाचा संपर्कही तुटला होता. जमीनदोस्त झालेला महापारेषण कंपनीचा १३२ केव्ही अतीउच्चदाब वाहिनीचा मनोरा तत्काळ उभारणे शक्य नसल्याने, महावितरणच्या दुरूस्ती पथकाने पावसाचा जोर कमी होताच रात्रीपासूनच पर्यायी व्यवस्थेतून दुरूस्ती कार्याला सुरूवात केली होती. १३२ केव्ही मलकापूर या अतीउच्चदाब अपकेंद्रातून ३३ केव्ही पिंपळगाव काळे आणि पिंपळगाव काळेहून ३३ केव्ही जळगाव हे उपकेंद्र चार्ज करण्यात आले.त्यामुळे  काही भाग वगळता जळगाव शहराचा वीज पुरवठा रात्रीच पुर्ववत करण्यात आला.त्यानंतर जळगाव उपकेंद्रातून ३३ केव्ही जामोद उपकेंद्राला बॅकफिडींग करून जामोद शहराचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.३३ केव्ही जळगाव उपकेंद्रातून १३२ केव्ही जळगाव आणि ३३ केव्ही जळगाव आय.पी.डी.एस.हे उपकेंद्रही बॅक फीडींगने सुरू करण्यात आले.

जळगाव उपविभागातील ३३ केव्ही आसलगाव उपकेंद्र वगळता इतर उपकेंद्राचा आणि परिसरातील काही गावाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, परंतु वाहन आणि साहित्य नेण्यास पाण्याचा आणि चिखलाचा अडथळा येत असल्याने, ११ केव्ही वाहिनींचे वाहून गेलेले वीज खांब ,रोहित्राचे स्ट्रक्चर  दुरूस्ती कार्याला थोडा वेळ लागणार आहे.त्यामुळे प्रथम गावठाण फिडरचे वीज पुरवठा सुरळीत करण्याला महावितरणकडून प्राधान्य देण्यात येत असून लवकरच उर्वरीत गावाचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येणार आहे.

 

Protected Content