जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील एका इसमाच्या दुर्देवी मृत्यूनंतर त्यांच्या एकुलत्या मुलीने स्वतःवर कोसळलेलं दु:ख विसरून पित्याला खांदा देऊन अग्नीडाग दिल्याची घटना आज येथे घडली.
पिंप्राळा (जळगाव) येथील खंडेराव नगर परिसरातील भैरवनगरात राहणारे व रंगकाम करणारे विजय नामदेव वाणी ( वय ४७ ) यांचे आज मध्यरात्री अडीच चे सुमारास पोटाच्या विकाराने दुर्दैवी निधन झाले. विजय वाणी यांना चार बहिणी व एकुलती एक मुलगी असल्याने विजय यांच्या पार्थिवास मुलगी आकांक्षानेच अग्नीडाग द्यावा असा महत्त्वपूर्ण निर्णय समाज बांधवांनी घेतला. आकांक्षानेही तो मनापासून स्वीकारला. इयत्ता दहावीत असलेल्या आकांक्षाने जळगाव येथील नेरी नाका जवळील वैकुंठधाम स्मशानभूमीत पित्यास अग्निडाग दिला. पित्यास खांदा देऊन पार्थिवाचे पुढे अंत्ययात्रेत आकांक्षाने आदर्शवत पुत्रीचा धर्म पाळला. स्मशानभूमीत देखील आकांक्षा ने पित्याच्या पार्थिवावर अग्नीडाग देण्यापूर्वीचे सर्व यथोचित संस्कार पूर्ण करून त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. नुकतीच दहावीत गेलेल्या आकांक्षावर ओढवलेला हा दुर्धर प्रसंग पाहून अंत्ययात्रेत सामील झालेल्या उपस्थितांचे मनही हेलावले. विजय वाणी यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी व आकांक्षा ही मुलगी आहे.