नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मुलींना मोबाईल देऊ नका, त्या मुलांसोबत पळून जातात असे हास्यास्पद वक्तव्य करणाऱ्या उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष मीना कुमारी टीकेच्या धनी ठरल्या आहेत
उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी यांनी अजब वक्तव्य केलं आहे. अलीगड आणि प्रदेशात वाढत्या बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मीना कुमारी यांनी समाजातील मुलींवरही लक्ष ठेवायला हवं असे म्हटले आहे. मीना कुमारी यांनी मुलींच्या मोबाईल वापरण्यावरही टीका केली आहे.
“मी सगळ्यांना सांगते की, मुली मोबाईलवर बोलत असतात आणि प्रकरण लग्न करण्यासाठी पळून जाण्यापर्यंत पोहोचतं” असं वक्तव्य मीना कुमारी यांनी केली आहे. अलिगढ आणि उत्तर प्रदेशात बलात्काराच्या वाढत्या घटनांसंदर्भात पत्रकारांनी मीना कुमारी यांना प्रश्न विचारला होता. त्यावर कठोरपणे कारवाई तर केली जात असल्याचे त्यांनी म्हटलं. आपल्या लोकांसोबत समाजालासुद्धा यावर काम करावे लागेल असेही त्या म्हणाल्या.
“आपल्या मुलींकडेही पाहायला हवं की, त्या कुठे जातात आणि कोणासोबत बसतात. मोबाईलकडेही पाहायला हवं. सगळ्यात आधी मी सगळ्यांनी सांगते की मुली मोबाईलवर बोलतात आणि प्रकरण एवढ्या लांब पर्यंत पोहोचतं की लग्न करण्यासाठी ते पळून जातात,” असे मीरा कुमारी म्हणाल्या.
काल माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं. वेगळी जात असलेले मुलगा आणि मुलगी माझ्याकडे आले होते. त्यांनी लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. गावातल्या पंचायतीने त्यांना गावात घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे मी विनंती करते की मोबाईल देऊ नका. जर दिला तर पूर्ण लक्ष ठेवा. मी मुलांच्या आईला सांगते की, मोबाईल दिला तर त्याच्यावर लक्ष ठेवा. आईच्या निष्काळजीपणामुळेच मुलींचे हे हाल होतात,” असे मीना कुमारी म्हणाल्या.
उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. मी फक्त मुली नाही तर मुलांच्या बाबतीतही ते वक्तव्य केलं होतं. अल्पवयीन मुलांचे आणि मुलींचे मोबाईल त्यांच्या कुटुंबियांनी वेळोवेळी तपासायला हवेत असे मीना कुमारी म्हणाल्या.
त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. “मॅडम मुलींच्या हातातील मोबाईल बलात्काराचे कारण नाही आहे. बलात्काराचे कारण अशी वाईट मानसिकता आहे ज्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते. पंतप्रधानांना विनंती आहे की सर्व महिला आयोगांना संवेदनशील बनवावे, दिल्ली महिला आयोगाची काम पाहण्यासाठी त्यांना एक दिवस पाठवा, आम्ही त्यांना शिकवतो!” असे दिल्ली महिला आयोगाच्या स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.