जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांना महापालिकेतर्फे सील लावण्यात येत आहे. त्यानुसार उद्या बुधवारी ४ ऑगस्ट रोजी थकबाकी वसुली व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधक्षिक यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
महापालिकेच्या 18 व्यापारी संकुलांतील गाळ्यांची मुदत 2012 ला संपली. तेव्हापासून आजपर्यंत गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने मे 2018 पर्यंतचे गाळेभाडे व मालमत्ता बिले वितरित केली आहेत. काही गाळेधारकांनी हरकत कायम ठेवून प्रशासनाने दिलेल्या बिलांच्या रकमेनुसार भरणा न करता विशिष्ट रकमेचाच भरणा केला. परंतु गाळेधारकांनी अद्याप पूर्ण भाडे व मालमत्ता कराची रक्कम भरलेली नाही. त्यात सुमारे सतराशे गाळेधारकांनी भरलेल्या रकमेतून केवळ 22 कोटी रुपये वसूल झाले. त्यानंतर महापालिकेने गाळेधारकांना नोटीसा पाठवून आणि वारंवार वेळ देवून अद्यापपर्यंत गाळे धारकांनी थकबाकी भरलेली नाही. तसेच गेल्या दोन दिवसांपासून शहरातील गाळे सील करण्यासंदर्भात कारवाई होणार की नाही अशी चर्चा सुरू असतांनाच आज मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी महापालिकेच उपायुक्त प्रशांत पाटील यांनी उद्या बुधवार ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या गाळेधारकांची थकबाकी आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना पत्र देवून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. यावर उद्या होणाऱ्या कारवाईकडे व्यापारी बांधव व गाळेधारकांचे लक्ष लागून आहे.