मुंबई (वृत्तसंस्था) राज्यभरातील आमदार विधीमंडळात आपले औचित्याचे मुद्दे उपस्थित करतात मात्र, त्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना वेळेत उत्तरंच मिळत नाही. या मुद्द्यावरून भडकलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राज्याचे मुख्य सचिवांना सभागृहात येऊन माफी मागण्याची शिक्षा दिली. परंतू विरोधीपक्षासह सर्वच पक्षीय नेत्यांनी विनंती केल्यानंतर पटोले यांनी कारवाई मागे घेतली.
सभागृहात आज नाना पटोले म्हणाले की, मागच्या अधिवेशनात 83 औचित्याचे मुद्दे होते. त्यापैकी फक्त 4 उत्तरं पाठवण्यात आली आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात झालेल्या कामकाजाबाबत सचिवालयात अधिकारी दखल घेत नाहीत. तहसीलदार पण आमदारांचे ऐकत नाही, आदर करत नाही, आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. परंतू मी जोपर्यंत खुर्चीत आहे, तोपर्यंत माझ्या सभागृहाचा अपमान केला तर मी कारवाई करणारच. आता यापुढे अश वागणुकीला मुख्य सचिवांनाच जबाबदार धरले जाईल. मुख्य सचिवांनी प्रशासन कसे काम करते याकडे बघितले पाहिजे, असे देखील पटोले म्हणाले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना इतकी शिक्षा नको अशी भूमिका घेतली. तर विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर अजित पवार यांच्याशी सहमती दाखवली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांनी जी विनंती केली ती आपण मान्य करावी, अशी विनंती केली. तर यावर मुख्य सचिवांनी माफ करा, आम्ही सुधारणार करु, असे आश्वासन दिले. सगळ्यांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर मी कारवाई मागे घेतो, असे पटोले यांनी जाहीर केले.