मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरेंना आजारी पाडले असा धक्कादायक दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.
मनसेच्या घे भरारी या अभियानातील कार्यक्रमात प्रकाश महाजन म्हणाले की, सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री करेल अशी शपथ उद्धव ठाकरेंनी घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना वाटायचं आपणच मुख्यमंत्री होऊ. पण घरी सैरंद्रीने केस मोकळे सोडले. सैरंद्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात काही रस नव्हता. त्यांना मुलाला मंत्री करायचं होतं. रश्मी ठाकरे यांना नवर्याच्या मुख्यमंत्रीपदात काहीच रस नव्हता. त्यांना आपल्या मुलाला मंत्री झालेलं पाहायचं होतं. त्यामुळेच हा आघाडीचा घाट घातला गेला. उद्धव ठाकरे आजारी होते यावर शंका उपस्थित होत आहे. पण घरच्या तापापायी त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू केला. मुळातच औकात म्हणजे क्षमता औकात नसलेल्या माणसाला गादीला बसवलं. मला संशय आहे की आजारपण सुद्धा खरं की खोटं होतं. कारण कारभार यांना करायचा होता. त्यामुळे यांना आजारी पाडलं अन् कारभार सुरू केला, असे प्रतिपादन प्रकाश महाजन यांनी केले.
याप्रसंगी प्रकाश महाजन यांनी ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे बापाचं भांडवल आणि बापचं नाव घेऊन आले. त्यांना बाकीचा काही अनुभव नाही. एखादी शाखा चालवण्याचा अनुभव नाही. हे सरकार स्थापन झालं. या सरकारनं असं काय केलं? कोरोना आला मुख्यमंत्री घरात बसले. बापाने दिलेलं भांडवल दहा वर्षात बसवणारा हा नतद्रष्ट पोरगा निघाला. महाभारतात धर्मराजाने आपलं सर्व राज्य, भाऊ, बायको पणाला लावले आणि युद्धात हरले. इथं मात्र, कारभार सुरू झाला आणि बायकोने इतका हस्तक्षेप केला की, नवर्याचं राज्य पणाला लागलं, मुख्यमंत्रीपद गेलं. अर्थात ते आलंच असं होतं की, जाण्याचं दुःख वाटण्याचं कारण नाही, अशा शब्दात महाजन यांनी ठाकरेंवर टीका केली.