जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील पं.स.माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या खूप प्रकरणाती अजून एका संशयित आरोपीला इंदूर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. खून केल्यापासून संशयित आरोपी हा फरार होता. संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात मध्यप्रदेशात वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत.
मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील (डी.ओ.पाटील) यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या कार्तिक टोपलिया उर्फ सुपडया जाधव (वय-२४, दिग्वीजय मंडी, इंदूर, मध्यप्रदेश) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदूर येथून अटक केली. गुन्हा घडल्याच्या दिवसापासून कार्तिक हा फरार होता.
मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर ओंकार पाटील (डी.ओ.पाटील) यांच्या खून१७ जून रोजी पहाटे कुऱ्हा येथे पेट्रोल पंपावर झोपलेल्या अवस्थेत धारदार शस्त्राने खून झाला होता. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खून व आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती हा खून राजकीय वैमनस्यातून झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी कुऱ्हा ग्रामपंचायत सदस्य तेजराव भास्करराव पाटील(४९), विलास रामकृष्ण महाजन(५१), सैय्यद साबीर सैय्यद शफी (२९), सर्व रा.कुऱ्हा, ता.मुक्ताईनगर, निलेश ईश्वर गुरचळ (३०) व अमोल मुरलीधर लंवगे (२७) रा.नाडगाव ता.बोदवड यांना अटक करण्यात आली होती.
घटनेच्या दिवशी नीलेश, अमोल व कार्तिक असे तिघे होते. नीलेश याने हल्ला केला होता तर दोघे जण बाहेर दुचाकीवर थांबून होते. यातील कार्तिक टोपलिया उर्फ सुपडया जाधव हा फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी स्वतंत्र पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व मुक्ताईनगरचे निरीक्षक सुरेश शिंदे यांनी सहाय्यक फौजदार माधवराव पाटील,हवालदार रवींद्र पाटील, कमलाकर बागुल, दादाभाऊ पाटील, अशोक पाटील तसेच विजय पाटील व नरेंद्र्र वारुळे यांच्या पथकावर ही जबाबदारी सोपविली होती. या पथकाने केलेल्या चौकशीत कार्तिक हा इंदूर शहरात असल्याची माहिती मिळताच या पथकाने बुधवारी तेथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.