मुक्ताईनगर : प्रतिनिधी । नगर पंचायतीचा कारभार राम भरोसे असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे लोकांना जारचे पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे . प्रहार संघटनेचे डॉ . विवेक सोनवणे यांनी याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे
येथे सन २०१७ अखेर ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना भारत निर्माण योजने अंतर्गत वाटर फिल्टर प्लांटचे काम अपूर्ण राहिले तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी नगरपंचायतचे कर्मचारी म्हणून संबोधण्यात आले. नगरपंचायतीला विभागनिहाय विभागप्रमुख असणे महत्वाचे आहे पाणी पुरवठा विभाग लोकांना दररोज मुलभूत गरज म्हणून पाणी पुरवठा करतो परंतु नगरपंचायत असमर्थ ठरलेली आहे
येथे लोकांना दुषित पाणीपुरवठा करून जीवाशी खेळ सुरु आहे. मुक्ताईनगर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणारी पाण्याची टाकी ७० वर्षे जुनी व अत्यंत जीर्णावस्थेत आहे या टाकीवरील स्लॅब ठिसुळ होवून पडत आहे या उघड्या टाकीमध्ये बऱ्याच वेळेस भटके जनावर पडून मेले आहेत तेच दुषित पाणी शहरास पिण्यास दिले जात आहे दुषित पाण्यामुळे जनतेस पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे.
या भयावह परिस्थितीमध्ये नाईलाजास्तव शहरातील जनतेस बाराही महिने आरओचे पाणी बाहेरून विकत घेऊन प्यावे लागत आहे. कोरोना असताना हाताला काम नाही अशा परिस्थितीमध्ये शहरातील जनतेस पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे याला जबाबदार मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे .
दुषित पाणीपुरवठ्यावर न.पा. कडून कायमचा तोडगा काढला जात नाहीच. म्हणून नगरपंचायतमार्फत शुद्ध पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी घेण्यात येऊ नये . ग्रामपंचायतचे रुपांतर न.पा. मध्ये होवून ४ वर्षे उलटूनही कर्मचाऱ्यांचे न.पा. मध्ये समावेशन नाही याकडे वरिष्ठांचा कानाडोळा का? , असा प्रश्न हे कर्मचारी विचारात आहेत उपलब्ध संसाधन तोकडे असून जीर्णावस्थेत आहे. न.प. मध्ये विभागनिहाय विभागप्रमुख असणे गरजेचे आहे कर्मचारीसुद्धा प्रशिक्षित हवे परंतु कर्मचाऱ्यांना कोणत्याच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
वरिष्ठ पातळीवरून पाणी पुरवठा विभागाची चौकशी करून त्यात तफावत आढळल्यास दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येणे गरजेचे आहे तज्ञ वरिष्ठांकडून पाहणी करून पाणीपुरवठा प्रश्नातील सर्व अडथळे दूर करण्यात यावे असे निवेदन प्रहारचे डॉ. विवेक सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, राज्यमंत्री ना.बच्चू कडू, विभागीय आयुक्त ( नाशिक ) यांना दिले आहे .