मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कुलाबा, दादर, सांताक्रूझ आणि अंधेरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, तीन जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. आज आणि उद्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यात नैऋत्य मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा, दक्षिण गुजरात व उत्तर महाराष्ट्रावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे राज्यात येत्या आठवड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.