मुंबई पोलिसांनी ताणलेला तपास सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ; संजय राऊत यांचा सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीजना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नको तितका का खेचला? हे प्रकरण हाय प्रोफाईल होत असल्याचे दिसताच पोलिसांनी माध्यमांना त्याबाबत दिवसाआड माहिती का दिली नाही, असा सवाल करत संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनाही धारेवर धरले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणाला राजकीय वळण लागल्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून विविध प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगळे का झाले? याचा तपास का झाला नाही? मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नको तितका का खेचला? हे प्रकरण हाय प्रोफाईल होत असल्याचं दिसताच पोलिसांनी माध्यमांना त्याबाबत दिवसाआड माहिती का दिली नाही, असा सवाल करत संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनाही धारेवर धरले आहे.

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे’ असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला आहे.

 

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूआधी त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिने आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणे संपूर्ण वेगळी. पण राजकीय पुढारी दोन आत्महत्यांचा धागा जुळवत आहेत. दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिला इमारतीवरून फेकले, असा आरोप भाजपाचे एक पुढारी करतात तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबाचा थोडाही विचार केलेला दिसत नाही. दिशा सॅलियनच्या वडिलांनी एक पत्र लिहून याबाबत खंत व्यक्त केली. मृत्यूनंतर माझ्या मुलीची व आमच्या कुटुंबाची बदनामी का करता, हा तिच्या माता-पित्यांचा सरळ प्रश्न आहे. दिशा सॅलियन हिचे संपूर्ण कुटुंबच या बदनामीमुळे मानसिकदृष्टय़ा खचले आहे. तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले असे आता समोर आले’ असंही संजय राऊत यांनी सांगितले.

Protected Content