मुंबई :वृत्तसंस्था । खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी हा आदेश काढला आहे. आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहे.
राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मुंबईसह राज्यातील कोरोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढला असून, रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले, तरी मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असे आदेश दिले आहेत.
मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शाळा ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचं सॅनिटायझेशन होणं गरजेचं आहे. अजून अनेक शाळांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही.