नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावर आपल्याला एकत्र काम करावं लागेल. मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि या मुद्यावरून राजकारण करू नये… स्थलांतरीत मजुरांची जबाबदारी त्यांनी समजून घ्यायला हवी, असे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज स्वावलंबी भारत पॅकेजबद्दल माहिती देण्यासाठी पाचवी आणि शेवटची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना स्थलांतरीत मजुरांविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी, ‘पीडीएस आणि मनरेगासारख्या योजनांचा मजूर तेव्हाच लाभ घेऊ शकतील, जेव्हा ते आपल्या घरी पोहचतील. परंतु, अद्यापही लाखो लोक रस्त्यावर चालत जाताना दिसत आहेत’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मात्र निर्मला सीतारमण आक्रमक झाल्या. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा गरिबांचा कळवळा नाटक असल्याचे म्हटले आहे. रस्त्यावर बसून केवळ बोलल्याने मजुरांचे प्रश्न सुटणार नाहीत… उलट असे करून राहुल गांधी मजुरांचा वेळ वाया घालवत आहेत. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना आणि सामान घेऊन त्यांच्यासोबत चालून त्यांची मदत करायला हवी होती’ असेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले.