अहमदनगर (वृत्तसंस्था) मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले. आता मंत्रिपद टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, अशा शब्दांत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.
लोणी येथे आज पत्रकारांशी बोलताना विखे यांनी थोरात यांना प्रतिउत्तर दिले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीवरून विखे-थोरात यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याला फारसे गांभीर्याने घ्यावे अशी परिस्थिती नाही. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची कशी वाताहत झाली हे महाराष्ट्र पाहतोय. कोण कोणाच्या पाया पडतो हे पाहणारे थोरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात काय करायचे? असा प्रश्न देखील विखे यांनी विचारला आहे. तर सत्तेत सहभाग असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला आठ-आठ दिवस मुख्यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हे दुर्दैव आहे. एवढी लाचारी पत्करून सत्तेत का राहता?, असा सवाल उपस्थित करून कॉंग्रेसवर बोचरी टीका केली आहे.