पॅरिस : वृत्तसंस्था । पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज फायटर विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि अगोस्टा ९० बी वर्गातील पाणबुडी आहे. पाकिस्तानने या शस्त्रांमध्ये अपग्रेडेशनची म्हणजे सुधारणा करण्याची विनंती केली होती. पण फ्रान्सने पाकिस्तानची मागणी धुडकावून लावली आहे.
मध्यतंरी इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतलीय त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध करण्यात आला. यामध्ये इम्रान खान सुद्धा होते. त्यांनी मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती.
फ्रान्सने पाकिस्तानच्या संरक्षण सामुग्रीच्या अपग्रेडेशनला दिलेला नकार ही त्याचीच परिणीती आहे. पाकिस्तान आणि फ्रान्समध्ये संबंध बिघडले आहेत. पाकिस्तानकडून येणारी कोणतीही विनंती फ्रान्सकडून तपासली जाते.
सप्टेंबर महिन्यात चार्ली हेब्दो मॅगझिनच्या जुन्या ऑफिसजवळ हल्ला झाला होता. अली हसन नावाच्या पाकिस्तानी वंशाच्या युवकाने दोन जणांना भोसकले होते.
मॅगझिनचे ऑफिस दुसऱ्या ठिकाणी आहे, याची त्याला कल्पना नव्हती. या अली हसनचे वडिल पाकिस्तानाता राहतात. ते नंतर स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते की, “माझ्या मुलाने खूप चांगले काम केले आहे. या हल्ल्याबद्दल मी आनंदी आहे.” या अशा प्रकारांमुळे फ्रान्स आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत.
इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारधारेबद्दल, जी भूमिका घेतलीय त्यावरुन त्यांचा मुस्लिम देशांमध्ये निषेध सुरु होता. त्यावेळी भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर होणाऱ्या व्यक्तीगत टीकेचा निषेध केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे समर्थन केले. मॅक्रॉन यांच्यावर होणारी व्यक्तीगत स्वरुपाची टीका हे आंतरराष्ट्रीय मानकांचे उल्लंघन असल्याचे भारताने म्हटले होते