मावळ्यांचा उल्लेख ‘मराठा आक्रमक’; गोव्याच्या पर्यटन विभागाचा प्रताप

 

 पणजी : वृत्तसंस्था । अगौडा किल्ल्यातील तुरूंगाबद्दल माहिती देताना गोव्याच्या पर्यटन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमणकर्ते असा केला. आहे

 

पर्यटन विभागाकडून करण्यात आलेल्या या ट्वीटवर संताप व्यक्त करण्यात आला. गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी यावरून सुनावल्यानंतर पर्यटन विभागाने ट्वीट डिलीट करत माफी मागितली आहे.

 

गोव्यातील ऐतिहासिक  अगौडा किल्ल्यातील तुरूंगाविषयी पर्यटन विभागाने ट्वीट केलं होतं. या ऐतिहासिक वास्तूंची माहिती देताना ट्वीटमध्ये पर्यटन विभागाने डच आक्रमकांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखालील मराठा मावळ्यांचा उल्लेख मराठा आक्रमक असा करण्यात आला. त्यावरून विरोधकांनी भाजपा सरकारला फैलावर घेतलं.

 

“अगौडा तुरुंग अप्रतिम अगौडा किल्ल्याच्याच भाग आहे. हा किल्ला १६६२ मध्ये निर्माण करण्यात आला होता. डच आणि मराठा आक्रमकांच्या विरोधात पोर्तुगीजांचं संरक्षण करणारा हा किल्ला आहे. हा दोन भागांमध्ये विभागण्यात आलेला आहे,” असं ट्वीटमध्ये म्हणण्यात आलं होतं. पर्यटन विभागाने डच आक्रमकांबरोबर मराठा सैनिकांचाही आक्रमक असा उल्लेख केल्यानंतर टीका सुरू झाली.

 

 

पर्यटन विभागाच्या वादग्रस्त ट्वीटवरून काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारला सुनावलं. दिगंबर कामत यांनी ट्वीट करत हा मोदींचा आधुनिक इतिहास आहे का असा सवाल केला आहे. “गोव्यातील बेजबाबदार सरकारने महान योद्ध्यांचा उल्लेख आक्रमक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा शूरांचा अपमान केला आहे. हा मोदींचा आधुनिक इतिहास आहे का?,” असा सवाल कामत यांनी केला.

 

 

टीका सुरू झाल्यानंतर पर्यटन विभागाने ट्वीट डिलीट करत माफी मागितली. “अगौडा किल्ल्यासंदर्भात करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये डच सैन्यासाठी आक्रमक शब्द वापरण्यात आला होता. डच आक्रमक आणि मराठा राजवटीविरोधात मजबूत राहिलेला किल्ला असं म्हणाचंय होतं. झालेल्या चुकीबद्दल माफी असावी,” असं ट्वीटमध्ये म्हटलेलं आहे. गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनीही याची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. “हे चुकीने झालं आणि ट्वीट डिलीट करण्यात आलं आहे. चौकशी करण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात येईल,” असं पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी सांगितलं.

Protected Content