जळगाव, प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पिळोदे येथील असलेले व चांदवड येथे कार्यरत असलेले डॉ. मोहन वारके यांनी पंधरा दिवस मालेगाव येथे कोरोना रुग्णालयात कर्तव्य बजावून परतल्यानंतर त्यांचे मनमाड उपजिल्हा रुग्णालयात स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात असलेले वैद्यकीय अधिकारी यांची मालेगाव व नाशिक येथील कोव्हिड रुग्णालयात ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये १५ दिवस काम आणि त्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन, अशाप्रकारे सेवा बजावली जात आहे. असेच मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मोहन वारके यांनी मालेगाव येथील जीवन रुग्णालयात १५ दिवस कर्तव्य व १४ दिवस क्वारंटाईन होऊन आज पुन्हा आपल्या रुग्णालयात कर्तव्यावर हजर झाले. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. नरवणे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले . तर येथील सर्व डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय यांच्यासह उपस्थित नागरिकांनी देखील डॉ. वारके यांच्यावर पुष्पवृष्टी करत व टाळ्या वाजवत स्वागत केले. लेवा पाटीदार समाजातील आणि सतत सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ.वारके यांचे समाजासह विविध स्तरातून कौतुक होत आहे . यावेळी परिसरात उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले .