यावल प्रतिनिधी । गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आल्याने रेशनकार्ड नसलेल्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. माती फाऊंडेशनच्या पुढाकाराने काळाडोह पाड्यावर रेशनकार्ड नसलेल्यांना आदिवासी बांधवांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
कोरोना या महाभयंकार संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात येवून काही आदिवासी कुटुंबियांना अन्नधान्य मिळत नाही. विविध कंपन्या तसेच छोटे-मोठे उद्योग धंदे हे बंद असल्याने रोजगार निर्मिती होऊ शकत नसल्याने याचा दुष्परिणाम ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात दिसून येत आहे. कामधंदे नसल्याने या कुटुंबांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. मिळेल ते काम धंदे करून आपल्या कुटुंबाची पोटाचे खळगी भरणारे गरीब कुटुंब या महामारील सामोरे जात असून सध्या शासनाकडून मिळणाऱ्या धान्याच्या प्रतीक्षेत दिसत आहे. ज्या कुटुंबांकडे रेशनकार्डच नाही अशी कुटुंब आजही धान्याच्या प्रतीक्षेत आहे. नुकतेच येथील तलाठी दीपक गवई, कोतवाल सुमन आंबेकर, पोलीस पाटील दिनेश बाविस्कर व रेशन दुकानदार यांनी मोर धरण काळाडोह, विटवा वस्तीसह शेती शिवारात फिरून आदिवासी कुटुंबांची ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा २०० कुटुंबांची यादी तयार केली.
या कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालय यावल येथे यादी सुपूर्त केली आहे परंतु १ महिना होउन सुद्धा या कुटुंबांना धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे विशेष म्हणजे यात बहुतेक आदिवासी पावरा बारेला कुटुंब असल्याने यांना धान्य लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी होत आहे. याची भालोद येथील माती फाऊंडेशनने घेतली असून हिंगोणा येथील काळाडोह, मोर धरण व विटवा वस्ती येथील आदिवासी बांधवांना जिवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी येथील तलाठी दीपक गवळी, माती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक जावळे, तुषार परतणे, खेताराम चौधरी, चेतन चौधरी, चेतन पाटील, उमेश झांबरे, नेमाराम चौधरी, अक्षय परतणे, मिलिंद चौधरी, चंदन चौधरी, भूपती इंगळे उपस्थित होते.