पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात शासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान न राहता लोकचळवळ झाली पाहिजे याकरीता जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्थांनी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, राजकिय पक्षांचे कार्यकर्ते यांनी या मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
या अभियानातंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरातील मोहल्ल्यात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करीत आहे. हे पथक तपासणीसाठी घरी आल्यानंतर नागरीकांनी त्यांना कुटूंबाची सविस्तर माहिती देऊन सहकार्य करावे. तसेच पथकांना कुटूंबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास अथवा कोणताही जुना आजार असल्यास त्याची खरी माहिती द्यावी, जेणेकरुन आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्यापासून रोखण्यास जिल्हा प्रशासनाला मदत होईल.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरीकांनी कोरानाला घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवताच तातडीने आपल्या नजीकच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी. नागरीकांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करणे व सॅनिटाझरचा वापर करणे या त्रिसुत्रीचा वापर करण्याचे आवाहन करुन जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस, महसुल व नगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना नागरीकांच्या सहकार्याची जोड मिळाल्यास जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करणे सहज शक्य होईल. असा विश्वासही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.