जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण देशाला व प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याला कोरोना या रोगाच्या संसर्गामुळे ग्रासून टाकलेले असताना राज्याचे प्रशासन व महा विकास आघाडीचे सरकार अतिशय जबाबदारीने व गंभीरतेने या रोगाशी लढा देत आहे. परंतु, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र राज्याच्या प्रशासन व सरकारवरती हलगर्जीपणाचा जो आरोप केला आहे या त्यांच्या वक्तव्याचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
राज्यावरती आलेल्या या अचानक संकटामुळे राज्याचा प्रत्येक नागरिक, राज्याचे प्रशासन म्हणजेच राज्यातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच साफ सफाई कामगार व सर्व पोलीस कर्मचारी वर्ग अतिशय जबाबदारीने व कटाक्ष पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशातच भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे एक प्रकारे चमकोगिरी करून सरकार व प्रशासनवरती बेताल वक्तव्य करण्यामध्ये व्यस्त आहे. आपण जर एखाद्याला मदत करत नाही तर जे लोक राज्यातील नागरिकांना मदत करीत आहेत व सरकार चालवीत आहेत अशा लोकांच्या कामांमध्येही आपण आडकाठी बनू नये अशी सूचक विनंती गिरिष महाजन यांना करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कोरोना हा फक्त आणि फक्त गिरीश महाजन यांचे केंद्रातील नेते यांच्या हलगर्जीपणामुळेच वाढला आहे याची जाणीव संपूर्ण देशाला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी व राज्य शासनावरती आरोप करण्याएवजी त्यांनी या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेले केंद्र सरकार यांना पत्र लिहावे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री व सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री तसेच राज्याचे सर्व प्रशासन हे अतिशय जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असल्यामुळे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सर्वांचे आभार व अभिनंदन करण्यात आले आहे.