पंढरपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संत सखाराम महाराजांच्या अमळनेर ते पंढरपुर पायीवारीचे बभळाज येथील महेश जोशी व संभाजीनगर येथील प्रविण कुळकर्णी यांच्या ‘वारी पंढरीची दिंडी सखारामाची’ व ‘पंढरपुरा नेईन गुढी!’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
महेश जोशी व प्रविण कुळकर्णी यांनी केलेले दैनिक वृत्तांत भाविकांच्या हृदयाला भिडणारे आहे. या वृत्तांताचे पुस्तक रुपाने केलेले संकलन आपणास पुढील वर्षी पंढरपुर वारी करण्यासाठी प्रेरणा देईल असे प्रतिपादन श्री संत सखाराम विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर-पंढरपुरचे विद्यमान गादिपती हभप प्रसाद महाराज यांनी केले.
‘वारी पंढरीची दिंडी सखारामाची’ व ‘पंढरपुरा नेईन गुढी!’ या दोन संकलित पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले कि, वारी म्हणजे काय हे प्रत्येकाने समजुन घेतले पाहिजे. या दोन्ही पुस्तकातील मनोगत लेखकांच्या भावना सांगतात. वारीत दररोज लिहिलेले वृत्त परिवारातील सदस्यांना भावले.
जळगाव येथील गिरीश कुळकर्णी यांनी २४ दिवसांचे वृत्त संकलित करुन पुस्तक तयार केले. त्यामुळे वाचकांना ते एकाच ठिकाणी वाचावयास मिळणार आहे. वारकरी संप्रदायावर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.